ना.धों. महानोरांबद्दल
चरित्र
ना.धों. महानोर
संपूर्ण नाव – नामदेव धोंडो महानोर.
जन्म औरंगाबाद जिल्हातील पळसखेडे ह्या गावी. शिक्षण पळसखेडे, पिंपळगाव, शेंदुर्णी, जळगाव येथे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापर्यंत. त्यानंतर आपल्या जन्मगावी शेतीचा व्यवसाय.
वयाच्या तेराव्या वर्षी नामदेवराव यांचे लग्न सुलोचना यांच्याशी झाले.
महानोरांचा पहिला काव्यसंग्रह, रानातल्या कविता (१९६७). त्यानंतर वही (१९७०) आणि पावसाळी कविता (१९८२)
पाणझड (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त) , गंगा वाहू दे निर्मळ हे कवितासंग्रह
प्रसिद्ध झाले आहेत. गांधारी (कादंबरी−१९७२), गपसप (१९७२), गावातल्या गोष्टी (१९८१−दोन्ही लोककथासंग्रह) असे गद्यलेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी केलेले लोकगीतांचे एक संकलनही (पळसखेडची गाणी, १९८२) प्रसिद्ध झालेले आहे.
महानोरांनी गद्यलेखन केलेले असले, तरी रसरशीत निसर्गभान जागविणारे कवी म्हणूनच मुख्यतः ते प्रसिद्ध आहेत. जिला अस्सल, संपन्न आणि तरल अशी ग्रामीण संवेदनशीलता म्हणता येईल, तिचा अपूर्व असा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. म्हणूनच पूर्वकालीन वा समकालीन कवींना प्रभावापासून ही कविता मुक्त आहे. तसेच लोकगीतांतील छंद-लय, जिवंत उत्स्फुर्तता, आपल्या मातीशी आणि बोलीभाषेच्या सहजतेशी नाते सांगणारी जिवंत शब्दकळा ही महानोरांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या ह्या खास संवेदनशीलतेतून स्वाभाविकपणेच आलेली आहेत. अनुभवागणिक नवी रूपे घेणाऱ्या त्यांच्या भाववृत्तींशी सूर जमविणारी चित्रमयताही त्यांच्या कवितेत आढळते. काही चित्रपटांसाठीही त्यांनी गीते लिहिली आहेत.
रानातल्या कविता, वही, गांधारी ह्या त्यांच्या पुस्तकांत महाराष्ट शासनाने पारितोषिके-पुरस्कार देऊन गौरविले आहे. गांधरीचे वर्ल्ड बुक ट्रस्ट इंडिया तर्फे 14 भाषेत भाषांतर. मराठीतील महत्त्वपूर्ण काव्यलेखनासाठी देण्यात येणारे ग. दि. मा. पारितेषिकही त्यांना मिळाले (१९८१-८२). महाराष्ट्रातील साहित्यिक−कलावंतांने प्रतिनिधी म्हणून १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केली.